वेद आणि सिद या २ मित्रांचा संवाद चालू होता.
“आज father’s day आहे म्हणे.”
“हां... ते days चे प्रकार वर्षभर चालूच असतात.”
“ते खरंय.”
“कशाला लागतात रे हे days?”
“कदाचित व्यक्त व्हायला.”
“बाकी जाऊ दे, पण तू वडिलांवर कितीही व्यक्त हो, त्यांना त्यांच्या
लेकापेक्षा लेकीच प्रिय.”
“हे काय सगळ्यांच्या बाबतीत लागू नाहीये.”
“अरे, पण जास्त करून असंच असतं की नाही?
“हो, पण त्यात बापाची चूक नाही. तो मुलीबाबत जास्त हळवा असतो इतकंच.”
“इतका हळवा की मला अगदी हिडीस-फिडीस करावं का?”
“सिद, chill. काय भांडला आहेस का वडिलांसोबत?”
“तसं नाही यार वेद, मुलाचं वडिलांसोबत नातं सोपं नसतं नाही?”
“नाही. नसतं. हे मला मान्य आहे.
“मी तर म्हणेन ते थोडं अर्धवट असतं.”
“अर्धवट?”
“हां... बाकी काही असो... पण त्या निमित्ताने म्हण किंवा काय, मी
वडिलांवर थोडसं लिहिलंय वेद..”
“तू लिहिलंयस?”
“हो.”
“मगाशी तर म्हणत होतास मला days चं काही कौतुक नाही आणि तू तर
लिहिलंयस...”
“आता बोलू की नको?”
“आता काय बोलतोस?”
“अरे म्हणजे ऐकवू की नको?”
“काय ऐकवतोस?”
“माझी थट्टा करणार असशील तर नंतर बोलू.”
“तसं नाही रे... तू आणि लिहिलं आहेस हे ऐकूनच जरा हसू येतंय.”
“एखाद्याला कौतुक वाटलं असतं, तुला हसू येतंय.”
“गप रे... college सुटल्यानंतर पेन सुद्धा हातात नाही घेतलंस आणि आज
काहीतरी लिहिलंयस??”
सिद काहीच बोलला नाही. आता मात्र वेद थोडा serious होत म्हणाला की ऐकव.
सिद थोडी background देऊ लागला, “कदाचित अनेकांच्या मनातलं असेल हे.”
वेद म्हणाला, “ते आम्ही ठरवू. मुद्द्यावर या.”
सिद बोलू लागला, “कवितेचं नाव आहे- बाप लेकाचं नातं!
त्यांना वाटावं मी काही बोलावं,
मला वाटावं त्यांनी काही बोलावं,
बाप-लेकाच्या नात्याचं गणित हे असं का असावं?
आमच्या या अबोल असण्याने दोघांना अधुरं अधुरं का सोडावं?
काही बोलायचं म्हणजे भय वाटावं!
न बोलणंच जास्त सोयीचं होऊन जावं!!
अंतराने संवादाला का मारावं?
आमचं नातं अधुरं का राहावं?
दुराव्याला घाबरावं,
जवळ येण्यालाही भ्यावं,
असलं कसलं नातं असावं?
बाप लेकांना ज्याने अधुरं ठेवावं!
बापाचं मग वय व्हावं,
त्याने अलगद ‘बाळा’ म्हणावं!
मलाही नकळत भरून यावं,
पण ते दाखवण्याचं धैर्य तेव्हाही नसावं!
बाप लेकाच्या नात्याला नेमकं काय म्हणावं?
आमच्या संवादाने कायम अबोल व्हावं!
घट्ट मिठीने संवादाला नवं स्वरूप द्यावं!
मी त्यांना बिलगावं,
त्यांना न दाखवता मी, नि मला न दाखवता त्यांनी, अश्रूंच्या धारेला
मोकळं होऊ द्यावं!
मी मोकळं व्हावं,
त्यांनी मोकळं व्हावं,
अधुऱ्या नात्याला अश्रूंनी धूसर करावं,
नि त्या अधुरं असण्याला आता कदाचित पूर्णत्त्व मिळावं!!”
वेद काहीच बोलत नव्हता. त्याने अलगद कवितेचा कागद घेतला. त्यावर खाली
सिद ने आपलं नाव लिहिलं होतं आणि तारीख होती. तारीख १ वर्षापूर्वीची होती.
वेद पटकन म्हणून गेला, “बाप-लेकाच्या नात्याचं गणित हे असं का असावं?
वर्षापूर्वी लिहिलेलं तू त्यांना आत्ता का द्यावंस?”
सिद म्हणाला, “कदाचित आमचं हे नातं असं अव्यक्तच असावं!!!”
- वरुण भागवत
खुपच छान
ReplyDeleteनेहमी प्रमाणे छानच
ReplyDeleteसुंदर!
ReplyDeleteSundar 👏
ReplyDeleteछानच
ReplyDeleteव्वा! लै भारी लिहिता तुम्ही, तुमची भेट घ्यायला आवडेल
ReplyDeleteThank you very much everyone!
ReplyDeleteChan lihilay varun
ReplyDelete