| A Click by: Varun Bhagwat |
राजाचे दोन सेवक सोमू आणि चंदू राजाच्या
अन्यायाला वैतागले होते. सोमू म्हणाला, “काही माणसांनी कितीही भ्रष्टाचार केला,
कसेही वागले, कोणाचं काही वाईट केलं, तरी त्यांचं काही वाईट होतंच नाही.”
“तू कशाला त्यांच्या वाईटावर आहेस पण?”
“नसावं का?”
“असावं का?”
“वाईट माणसांचं चांगलं व्हावं वगैरे असा विचार
मी करू शकत नाही.” सोमू जवळजवळ चिडतच म्हणाला.
“मी कुठे म्हणतोय असा विचार कर.” चंदू शांत
होता.
“तू स्पष्ट बोल.”
“मी म्हणतोय की त्यांचं चांगलं व्हावं हा
विचार नको करूस पण वाईट व्हावं असा सुद्धा विचार करू नकोस.”
“कालपर्यंत राजाचं वाईट चिंतणारा तू आज एकदम
असं बोलतोस तेव्हा मलाच आश्चर्य वाटतं.” सोमू बोलून गेला.
“किस्साच तसा घडलाय म्हणून मी हे बोलतोय.”
चंदू सांगत होता.
“नेमकं काय घडलंय?” सोमूने विचारलं.
चंदू सांगू लागला, “अरे काल राजा
नेहमीप्रमाणे शिकारीला गेला. पण जंगलाकडे जाताना वाटेवर भलतंच घडलं. आपल्या राजाला
कारण नसताना दुसऱ्याला त्रास देणं फार आवडतं. सोबत असणाऱ्या सेवकाची तो क्रूर थट्टा
करत होता आणि मजा घेत होता. थोडं पुढे गेल्यावर त्याने एक झाड शोधलं आणि झाडावर
जाऊन शिकारीची वाट पाहत बसला. राजाने खाली पाहिलं तर एक कुत्रा कारण नसताना एका
सश्याला छळत होता. बिचारा ससा घाबरून बिळाकडे परतू लागला. मात्र कुत्रा पाठ
सोडेना. सश्याची थट्टा करता करता कुत्र्याने एक फटका त्याला मारला. ससा बिळात
शिरला पण त्या फटक्यामुळे त्याच्या कानाला इजा झाली. तेवढ्यात एक माणूस तिथून जात
होता. माणसाच्या रस्त्यात हा कुत्रा येत होता. म्हणून माणसाने एक दगड उचलला आणि
कुत्र्याला मारला. कुत्रा केकाटत तिथून निघून गेला. राजासोबत आलेल्या सेवाकांपैकी
एकाचा घोडा मनमानी करू लागला आणि सुसाट सुटला. त्याच्या वाटेत तो कुत्र्याला दगड
मारणारा माणूस आला आणि घोडा त्या माणसाला जोरात धडक मारून गेला. माणसाच्या कंबरेत
त्या घोड्याची लाथ बसली नि माणूस जागेवर गप्प बसला. तो घोडा बेभान होता. त्याचा
स्वत:वर ताबा राहिला नव्हता. तो थेट समोरच्या एका झाडाला जाऊन धडकला. त्याला
चांगलीच दुखापत झाली. राजा हे सारं पाहत होता. अचानक आकाशवाणी झाल्यासारखा आवाज
त्याच्या कानावर आला, “राजा, तू तुझ्या कर्मानेच मरणार.” राजाचा विचार अचानक
बदलला. तो क्षणार्धात झाडावरून खाली उतरला. उतरता क्षणी मोठा आवाज झाला. राजाने
पाहिलं तर तो झाडावर ज्या जागी बसला होता तिथे वरतून एक मोठ्ठा दगड येऊन पडला
होता. राजा थोडक्यात बचावला होता.” चंदू बोलता बोलता थांबला.
“अरे बाप रे, खरंय. प्रत्येक जण आपल्या
कर्माने मरतो. म्हणून राजाने आज सर्वांशी संवाद साधायचा असल्याची घोषणा केलीये तर.
काय बोलायचं असेल राजाला? ” सोमू विचारपूर्वक म्हणाला.
“आजपर्यंत केलेल्या अन्यायाची माफी मागायची
असेल.” चंदू उत्तरला.
“तुला कसं माहित पण हे सगळं?” सोमूने
विचारलं.
“मी उल्लेख केल्याप्रमाणे शिकारीला जाताना राजा
ज्या सेवकाची थट्टा करत होता तो सेवक मी होतो. “तू तुझ्याच कर्माने मर!” ही राजाला
जी आकाशवाणी वाटली ती आकाशवाणी नसून राजा ज्या झाडावर बसला होता त्या झाडापेक्षा
अजून एका उंच झाडावर चढून मी बसलो होतो, राजाला मारायच्या हेतूनेच. पण जे राजाने
पाहिलं तेच मी पण पाहिलं... जो तो आपापल्या कर्माने मरत होता.” चंदूने खुलासा
केला.
सोमू
चंदूला म्हणाला. “खरं आहे. पण एक प्रश्न राहतोच. चंदू, तू मारलेल्या दगडाचा नेम चुकून
चुकला की मुद्दाम चुकवलास?”
- वरुण भागवत
chan Varun
ReplyDelete1 no... 👌👌👌👌
ReplyDeleteMast
ReplyDelete