| A click by: Varun Bhagwat |
प्रत्येकाचा आयुष्य जगण्याचा आणि त्याकडे
पाहण्याचा दृष्टीकोन फार वेगळा असतो. जो तो आपापल्या नजरेने, आपापल्या तऱ्हेने आयुष्याकडे
कसं बघायचं हे ठरवत असतो. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की समोरच्याची अशी
mentality कशी असू शकते आणि समोरच्याला प्रश्न पडतो की आपली mentality तशी असूच
कशी शकते? उत्तर मिळत नाही. आपण अस्वस्थ होतो. पण पुन्हा प्रत्येक जण वेगळा आहे. मूळ स्वभाव बदलत पण नाही. या सगळ्या विचारांनी
आणि प्रश्नांनी अक्षयला अक्षरश: दिवसभर घेरलं होतं.
त्याला वाटायचं की सगळी माणसं त्याच्यासारखी
सरळ जगतात. पण हळूहळू दुनियादारी कळत होती. निरनिराळी माणसं त्याला भेटत होती.
योगायोगानेच या प्रश्नांची उत्तरं त्याला स्वत:लाच त्याच रात्री वाचलेल्या
गोष्टीतून मिळाली.
एक होता बैल. तो खूप राबायचा, कष्ट करणं त्याला
ठाऊक होतं. एक होती पिसू. हिला काम हा शब्दच माहित नाही. कोणीतरी काम करतंय हे
पाहून तिला विशेष आश्चर्य वाटायचं. जसं या बैलाला ही पिसू काहीच काम करत नाही
यावरून आश्चर्य वाटायचं. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा होता. पिसू चा वेळ जात नसे.
बैलाला मोकळा वेळ मिळत नसे. अशाच रिकामटेकड्या वेळात पिसूने बैलाला विचारलं, “काय
भाऊ, किती काम करता... राब राब राबता... लोकांची ओझी उचलता... मी बघ. लोकांचं रक्त
पिते बस्स!”
बैल म्हणाला, “खरंय. तू फक्त तेच करू शकतेस.
मी कष्ट करतो. पण मग माणसं माझ्याशी प्रेमाने वागतात. चांगलं खायला देतात. मला आसरा
मिळतो. दमलो की मला छान थोपटतात आणि
माझ्यावर प्रेम करतात. मला कौतुकाची थाप देतात.”
पिसू तिच्याच तोऱ्यात म्हणाली, “मला पण थाप
देतात. पण मी ती घेत नाही. मी ती चुकवते. ती थाप जर मला बसली, तर तो माझा शेवट
असेल..”
गोष्ट वाचून संपली. अक्षयला वाटत होतं की आपण इतके कष्ट करतो एक
कौतुकाची थाप मिळविण्यासाठी. मात्र कितीतरी जण असे असतात ज्यांना ही थाप किंवा माणूस
जपणं वगैरे दुरापास्त असतं आणि त्यांना फरक पण पडत नाही. ही माणसं फक्त फायदा
बघतात. पण पुन्हा त्याला जाणवलं की माणसं विविध प्रकारची आहेत. कोणी थाप
मिळवण्यासाठी जगतं तर कोणी थाप चुकवण्यासाठी!
प्रत्येक जण आपण बदलू शकत नाही. प्रत्येकाला बदलायला सुद्धा जाऊ नये.
प्रत्येकाचा दृष्टीकोन ठरलेला असतो. तो आपण फार बदलू शकत नाही. आपण आपल्याला योग्य
वाटतं ते मात्र नक्की करू शकतो. आपण बैल आणि पिसू याच्या मधलं काहीतरी होऊ शकतो.
फक्त कौतुकाची थाप घेणारे नाही तर देणारे पण बनू शकतो. आपण बघू तसं जग आहे. आपला
दृष्टीकोन आपलाच आहे.
-
वरुण भागवत
Sundar!
ReplyDeleteChan
ReplyDeleteChan
ReplyDeletekhup chan
ReplyDeleteEkdum Kharay re ...
ReplyDeleteMastch lihile aahes...
👌👌👌👌
Kharay
ReplyDelete