Skip to main content

ये दोस्ती...

A Click by- Sushil Ladkat

एक सिंह जंगलाजवळ असणाऱ्या एका शेतावर नजर ठेवून होता. त्या शेतात ४ बैल काम करायचे. हे चारही बैल एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. सिंहाला बैलाची शिकार करायची होती. मात्र ते चौघे कायम एकत्र असल्या कारणाने त्याला हे शक्य होत नव्हतं. तरीही तो संधीची वाट पाहत होता. त्याने एकूणच त्यांच्या रोजच्या दिनक्रमाचा अभ्यास केला होता. अभ्यासातून एक गोष्ट त्याला कळली होती की दिवसातल्या एका ठराविक वेळी हे चौघे एकमेकांसोबत नसतात. त्यावेळी ते वेगवेगळ्या दिशांना जाऊन चक्कर मारून येतात. मात्र तरीही त्याला एक गोष्ट जाणवली की हे एकमेकांपासून फार दूर जात नाहीत.

त्याने साधारण अर्थ हा काढला की समजा आपण हल्ला केलाच तर बाकी बैल जे साधारण नजरेच्या टप्प्यात आहेत ते येतील आणि आपल्यालाच पळ काढावा लागेल. कितीही मोठा सिंह असला तरी ४ बैल नक्कीच भारी पडू शकले असते. म्हणून सिंहाने वेगळंच अस्त्र निवडलं. त्याने बोलण्याचा पर्याय निवडला.

जेव्हा बैल एकएकटे चक्कर मारायचे तेव्हा त्यातल्या एका बैलाला त्याने गाठलं. आधी तो बैल त्याच्याशी बोलायला पुढे जात नव्हता. सिंह म्हणाला, “अरे तुझे मित्र आजूबाजूला आहेत. ते जवळ असताना मी हल्ला का करेन? आणि मुळात मी तुझ्याशी बोलायला आलोय. मैत्री करायला आणि सावध करायला आलोय.” अशा आपल्या मधुर वाणीने त्याने बैलाला विश्वासात घेतलं आणि दाखवलं की त्याच्यापासून त्याला धोका नाहीये. तर त्याच्याच मित्रांपासून आहे. फोडा आणि झोडा ही नीती सिंहाने वापरली. ही गोष्ट प्रत्येक बैलाच्या बाबतीत करण्यात सिंह यशस्वी झाला. त्याने एकमेकांबद्दल त्या बैलांच्या मनात विष कालवलं.

सिंहाला आपल्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. लाकडाची एकत्र बांधलेली मोळी सहजा सहजी तुटत नाही. मात्र त्यातली लाकडं वेगवेगळी केली की तोडणं सोपं होऊन जातं. सिंह स्वत:च्या यशावर स्वत:शीच हसला.

 

त्याला आता चौघांमधल्या नात्यात आधीपेक्षा फरक जाणवू लागला. ते जास्त एकत्र नव्हते. त्यांचा एकटं राहण्याचा कालावधी वाढत होता. सिंहाला एक दिवस मोठ्ठी संधी चालून आली. त्याला जाणवलं, त्यांच्यातला एक बैल एकटा फिरत होता.  बाकी बैल आजूबाजूला नाहीत ही खात्री सिंहाने केली. संधी साधून तो त्या एकट्या बैलावर हल्ला चढवायला गेला. मात्र घडलं वेगळंच. बैल सतर्क होता. त्याने हल्ला चुकवला. सिंह सावरेपर्यंत तिथून थोड्या अंतरावर लपलेले बैल धावत आले आणि तिथे पोचले.

 

सिंहाला हा प्रकार कळेना. ज्याच्यावर सिंहाने हल्ला करायचा प्रयत्न केला होता तो बैल म्हणाला, “आमची मैत्री तोडून आम्हालाच वेगळं करायला निघाला होतास? सुरुवातीला तू जे बोललास ते मला क्षणभर खरं वाटलं. पण आम्ही नावाला मित्र नाही आहोत. काही असेल तरी एकमेकांशी share करतो. या वेळी सुद्धा आमच्या मधलं वातावरण गढूळ होतंय असं जाणवताच मनमोकळेपणे आम्ही बोलायचं ठरवलं. एक तिऱ्हाईत आपल्यात किती सहज फूट पडू शकतो हे जाणवलं. एकमेकांशी मोकळं बोलण्याचा फायदाच झाला.” दुसऱ्या बैलाने या बोलण्याला पुष्टी दिली आणि म्हणाला, “मग म्हणलं चला, तुझ्या चालीत तू यशस्वी होतो आहेस असं तुला भासवूया. तुझ्या मनात अजून पुढे काय आहे हे जाणून घेऊया.” तिसरा बैल पुढे म्हणाला, “आज तो दिवस आलाच. एकटे असतो तर आज तुझी शिकार झालो असतो. पण तुला सुद्धा माहित आहे की एकत्र असलो की तू आमचं काहीच वाकडं करू शकणार नाहीस.”

हे कायम एकत्र असताना हा हल्ला शक्य नाही हे जाणवून सिंह तिथून निघून जाऊ लागला. तेवढ्यात त्याला थांबवत चौथा बैल बोलू लागला, “आणि ऐक, आजोबा काय फक्त तुला होते... आम्हालाही लाकडाच्या मोळीची गोष्ट माहितीये. फरक इतकाच की तुला तुझ्या आजोबांनी शिकवताना आधी लाकडं मोळीतून वेगळी कर म्हणजे शिकार सोपी जाईल असं सांगितलं. आम्हाला मात्र गोष्ट सांगताना लाकडाची मोळी कायम बांधलेलीच असली पाहिजे असं वचन आमच्या आजोबांनी घेतलं.”     

 

-       वरुण भागवत

- 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...