![]() |
| A click by: Sushil Ladkat |
२ मित्र- गोविंद आणि रमाकांत घराबाहेरच्या रस्त्यावर
चालत गप्पा मारत होते.
“गोविंद, माझ्या मते या जगात चांगली माणसं
वगैरे काही उरली नाहीयेत.”
“मला वाटतं की आपण चांगलं काम केलं तर आपल्या बाबतीत
चांगलंच घडतं.”
“असं काही नाही.”
“अरेच्च्या... अरे रमाकांत, आपण एखाद्याच्या बाबतीत चांगले वागलो तर
कधी ना कधी त्याची परतफेड चांगल्या मार्गानेच होते.”
“माझा ना या तत्वज्ञानावर विश्वासच नाही.”
“पण तुला असं अचानक काय झालं?”
“अचानक वगैरे नाही. परवाचा incident आठवला. दारावर आलेल्या त्या
फुगेवाल्याला कशाला मदत केली? उगीच दया येत असते तुला...”
“हे बघ त्याचा मुलगा पण छोट्या मोठ्या गोष्टी विकत होता- तो गोड खाऊ खाण्याच्या वयात त्याला तो विकावा लागत होता. ते मला
पाहवलं नाही. मी त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी ते पैसे दिलेत.”
“त्याने त्याच रात्री त्या पैशाची दारू प्यायली असेल.”
“तुला काय माहित रे?”
“तुला तरी काय माहित की त्याने त्या पैशाचा वापर मुलाच्या
शिक्षणासाठी केला असेल?”
“तो म्हटला होता की मी माझ्या मुलाला uniform घेतला की दाखवायला
पहिला तुमच्याकडे घेऊन येईन.”
“थापा...”
“बरं...”
तेवढ्यात जवळच्या झाडावर बसलेलं एक कबुतर त्यांना दिसलं.
गोविंद म्हणाला, “लहानपणी ऐकलेली मुंगी आणि कबुतराची गोष्ट अशी छोटी
मदत करायला भाग पाडते.”
“म्हणजे?”
गोविंद सांगू लागला, “एक मुंगी नदीत वाहून चाललेली कबुतराला दिसली.
खरंतर तो दुर्लक्ष करू शकत होता पण त्याने पटकन एक काठी नदीत टाकली. त्या काठीच्या
आधाराने मुंगी किनाऱ्याला लागली आणि तिचा जीव वाचला. काही दिवसांनी एक माणूस त्या
कबुतराला पकडण्यासाठी त्याचं जाळं पसरवत होता. कबुतर बेसावध होतं. मात्र या
मुंगीचं लक्ष होतं. आधी तिला सुचेना की काय करावं. पण तिने परिस्थितीचं भान राखलं.
ती शिकारीसाठी आलेल्या त्या माणसाच्या पायाला कडकडून चावली. तो ओरडला. कबुतर सावध
झालं आणि पटकन झाडावरून उडून गेलं.”
“असं फक्त गोष्टीत होतं” असं म्हणत रमाकांत पुढे जाऊ लागला. त्याच्या
लक्षातच आलं नाही की आपला मित्र गोविंद मागे पडलाय. मागे क्षणार्धात भलतंच घडत
होतं. गोविंद गोष्ट सांगून झाल्यावर चालता चालता एका दगडाला अडखळून पडला होता.
मागून एक भरधाव दुचाकी येत होती. तिच्या horn च्या आवाजाने रमाकांत ने मागे पाहिलं.
मागे गोविंद पडला होता. गाडी येत होती. रमाकांत धावत गोविंद ला वाचवायला जाऊ
लागला. पण गाडी जवळ येत होती. तेवढ्यात हे पाहणारा एक माणूस प्रसंगावधान राखत गाडीकडे
इशारा करत “थांबा” म्हणून ओरडला. तोपर्यंत रमाकांत पोचला आणि दोघांनी पटकन गोविंद
ला रस्त्यातून बाजूला घेतलं. गाडी नुघून गेली. अपघात टळला.
“अरे तू इथे?” गोविंद आश्चर्याने म्हणाला.
“हो साहेब, तुम्हाला म्हणालो होतो ना पोराला uniform घेतला की
दाखवायला येईन. तुमच्या घरीच येत होतो आणि तुम्ही हिकडं चालताना दिसला. इचार केला
गाठावं इकडच. तेवढ्यात तुम्ही पडले आणि... ते बघा तिकडं थांबलंय पोरगं. तुम्हाला
लागलं नाही ना साहेब?”
गोविंद हसत म्हणाला, “नाही. Thank you.”
रमाकांत आ वासून पाहत राहिला.
-वरुण भागवत

Paratphed !👌👌👍👍
ReplyDeleteKhup Chan 🙋
हे सगळं खरं आहे पण या कलियुगात कोणावर विश्वास ठेवावा हे मात्र कळतं नाही हेही खरे, पण आपण चांगल्या मनाने नक्कीच मदत करत राहावी हेही नक्की 👍👍👍
ReplyDeletechan
ReplyDelete,👌👌👌
ReplyDeleteखूप छान वरुण, कार्य करत रहावे, विश्वास किंवा अविश्वास नंतर परतफेड होत असते
ReplyDelete