| Photo Courtesy- Poonam Godse |
“सर, अशी एक वेळ येऊ लागलीये जेव्हा वाटतंय
की मी इतकं काही करतोय त्याचा काही उपयोगच नाही. काहीच छान घडतंय असं वाटत नाही.
उदास व्हायला होतंय. माझं लक्ष्य खूप दूर चाललंय असं वाटतंय.” २२ वर्षांचा सुजय
आपल्या सरांना विचारत होता. प्रश्नाचा रोख आपल्याला कळलाच नाही असं भासवत सर म्हणाले,
“नेमकं काय म्हणायचं आहे तुला?”
“सर, तुम्हाला तर माहितीच आहे की अनेक जणांचा
विरोध पत्करून मी मला हवं असणारं field निवडलंय. मी वाट शोधतोय, अजून मिळत नाहीये.
पण मध्येच दुष्ट स्वप्न पडतं आणि त्यात मध्येच एकदम खोल खड्ड्यात पडल्यासारखं
वाटतं. वरती पाहतो तर सगळ्यांच्या नजरा सांगत असतात की आम्ही म्हणालो होतो की शक्य
नाहीये तुला हे... मग मला खूप मागे खेचलं गेल्यासारखं वाटतं.”
सर बारीकसं हसले.
“सर, अहो तुम्ही तरी हसू नका.” रडवेल्या स्वरात सुजय म्हणाला.
सर एकदम समजुतीच्या स्वरात म्हणाले, “अरे
बेटा तुला नाही हसत आहे मी. तू खड्ड्यात पडल्याचं म्हणालास त्यावरून काहीतरी
connect झालं.”
“काय?” उत्सुकतेने सुजय म्हणाला.
“खोल विहिरीत पडलेल्या बेडकांची गोष्ट आठवली.”
सर आठवल्यासारखं म्हणाले.
“सांगा ना.” सुजयची उत्सुकता वाढली.
सर सांगू लागले, “दोन बेडूक असेच काहीतरी
तुझ्यासारखं वेगळं शोधत असताना त्यांच्याच नकळत एका खोल विहिरीत पडले. अशा वाटेवर
चालताना आधी कोणी जवळ आणि सोबत नव्हतं. पण ते पडल्याचं कळताच इतर अनेक बेडूक जमले.
तुला जसं खड्ड्यात पडल्यावर जाणवतं तशाच काहीशा नजरा या काठावरल्या बेडकांच्या
होत्या. त्यांच्या नुसत्या नजराच नव्हत्या तर ते ओरडून सांगत होते की सोडून द्या
प्रयत्न... तुम्हाला बाहेर येणं शक्य नाही.”
“त्यांना वाचवायला कोणी आलं नाही?” सुजय तोडत
म्हणाला.
“अशा प्रसंगी बघ्यांची संख्या जास्त असते.
कोणी आपल्याला आपलं मानणारं असेल तर ठीक. नाहीतर आपला आपल्यालाच मार्ग काढावा
लागतो. पण बेडकांच्या सततच्या नकारात्मक बडबडीमुळे त्या दोघांतल्या एका बेडकाने
त्यांचं ऐकायचं ठरवलं. त्याने प्रयत्न सोडून दिले. तो प्राणाला मुकला. दुसरा बेडूक
मात्र हार मानेना. काठावरचे बेडूक ओरडत होते आणि हातवारे सुद्धा करत होते. हा
बेडूक प्रयत्न सोडतच नव्हता. त्याने सातत्य ठेवलं... वरचे बेडूक त्याला म्हणत
होते, “जीवाचे हाल करून मरण्यापेक्षा सोडून दे.” तो मात्र प्रयत्न करत राहिला. एक
वेळ आली आणि तो शेवटी बाहेर येण्यात यशस्वी झाला. सगळ्या बेडकांना आश्चर्य वाटलं. ते
तिथे सुद्धा म्हणत राहिले, “आम्ही तुला इतकं बोलून सुद्धा तू का बरं प्रयत्न करत
राहिलास. “ तरी बेडूक उत्तर देईना. तो खुशीत दिसला. बाकी बेडकांना काही कळेना. मग थोड्या
वेळाने असा खुलासा झाला की ह्या बेडकाला काही ऐकूच येत नाही. त्यामुळे वरचे बेडूक
जे त्याला खच्ची करायचा प्रयत्न करत होते ते त्याला ऐकूच आलं नाही. उलटपक्षी
त्यांचे हातवारे पाहून त्याची अशी समजूत झाली की हे सगळे त्याला वरती यायला आणि
त्यातून बाहेर पडायला प्रोत्साहित करत आहेत.”
सुजय काही क्षण सरांकडे पाहतच राहिला.
सर पुढे म्हणाले, “तुला कोण काय बोलतं या
पेक्षा तू ते कसं घेतोस हे महत्त्वाचं आहे. मग बघ, स्वप्नात पुन्हा खड्डा आला तरी
त्यातून बाहेर येणं तुझ्यासाठी भीती नसून एक आव्हान असेल. तू चालत रहा.”
-वरुण भागवत
असाच चालत रहा ... 👍
ReplyDeleteव्वा... धन्यवाद.
ReplyDeleteWaa!
ReplyDeleteVery interesting and sportly motivation... 👌👌👍👍
खरंच छान गोष्ट, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर सर्वच निभावून जातं
ReplyDeleteसुंदर 👍
ReplyDeleteMasta connect kela...👌👌👌
ReplyDeleteव्वा, अतिशय प्रेरक.. मनाला नवी उमेद देणारं लेखन आहे.. असाच लिहीत राहा
ReplyDeleteThank you all
ReplyDelete